शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी

दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
दारू बिरू पियुन अगदी झींगली होती कार्टी.
दुख म्हणाले "दोस्तानो!!बिलकुल लाजू नका
इतके दिवस छळले म्हणून राग मानू नका
मनात खूप साठलं आहे  पण काहीच सुचत नाही
माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता मला  राहवत नाही
मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा एका जत्रेत गेलो होतो
गर्दी अशी जमली नि गोंधळ असा उठला.....
.माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला
तेव्हापासून फिरतोय शोधत सुखाला दुनियेच्या जत्रेत
पाहतोय दिसते का सुख माझे कोणाच्याही नजरेत
सूखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने दुख ढसाढसा रडले
नशा सगळ्यांची उतरली दुखाकडे पाहून
दुखालाही सुख मिळावे असे वाटले सगळ्यांना राहून राहून
सुखाच्या शोधामध्ये आता मी सुद्धा फिरतोय
दुखाला शांत करायचा खूप खूप प्रयत्न करतोय
जीवनाच्या रथाचे आहेत सुख दुख सारथी
सुख जर मिळाले तर सगळ्यांना तेंव्हा दुखाच्या घरी परत  मीच देईन पार्टी.......… .


कॉपी पेस्ट टेक्नोलॉजी च्या सहायाने . . . कविता ज्याची कुणाची आहे त्याच्याकडे कवितेचे हक्क पूर्णपणे अबाधित 
-- Unknown

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

हे क्रांतिकारकांनो...!




बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला..
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला..
खाणं-पिणं, मौज-मजेला वेळ आम्हाला दिला


बरं झालं तुम्ही रक्त-मांस सांडलं..
सिमेंट-विटा समजून आम्ही घर त्यावर बांधलं
बरं झालं तुम्हीच चलेजाव म्हटलं..
संस्कार नि संस्कृतिला सहज आम्ही सोडलं

बरं झालं तुम्ही स्वातंत्र्य मिळविलं..
मुक्तपणे शील आम्ही वेशीला टांगलं
बरं झालं तुम्हीच तिरंगा फडकाविला..
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला..
खुर्चीसाठी भांडणे पाहायची वाचला..!


- मुन्ना बागुल
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

शुक्रवार, २५ जुलै, २०१४

शेतकरी राजा



बैल जुंपले नांगर
करावया मशागत,
भर उन्हात हकारीतो
राजा सरजाचीरे पात ||

माझा बाप शेतकरी
भर उन्हात कष्टकरी
नाही उन पावसाची जाण
धरती त्याचारे आहे प्राण ||

डौलदार पिक याव म्हणुनच
जिव ओवाळून टाकी

मातीच जिवरे तुझा तरिही
का झेलतो कर्जाचा बोजा  ||

राञं दिस एक करूनही
पिक भरवशाच  नाही
दुखः त्याच्याच नशिबी
सुखाची त्याला ओढ नाही||

जगवतो उभ्या जगाला
त्याच्या परी देव नाही
माझा बाप शेतकरी
सार्‍या व्यापाराचा  हितकरी||

त्याची किमयाच न्यारी
जगाचे जिवन त्याच्या उरी
गर्व आहे आम्ही पोरं त्याची
गातो थोरवी जगाच्या पोशिंद्याची ||

      ✒विराट शिंदे {9673797996}

शुक्रवार, ३० मे, २०१४

शिपिंग क्षेत्रातील संधी



शिपिंग व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधींची ओळख-
जहाजे नसती, तर अध्र्या जगातले व्यवहार ठप्प होतील. व्यापाराचे आकारमान आणि मूल्य लक्षात घेता जगभरातील ९० टक्क्य़ांहून अधिक व्यापार हा जहाजामार्गे होतो. जशी लोकसंख्या वाढते व विकसनशील देशांची प्रगती होत जाते, तसतसा हा व्यापार वाढत जातो. आपल्या देशामध्ये, पंजाब व इतर उत्पादन क्षेत्रांमधून जो माल व्यापारासाठी येतो, तो कंटेनर्समधून पाठवला जातो. त्यामुळे वाहतुकीचे लॉजिस्टिक्स हासुद्धा शिपिंगचा अविभाज्य घटक आहे.

भारताने २०२० सालापर्यंत १०० कोटी टन माल व्यापारासाठी पाठवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. आजमितीस आपण केवळ ६०० दशलक्ष टन इतकाच माल हाताळू शकतो. नजीकच्या भविष्यात मोठय़ा बंदरांची वाढ तसेच नवीन बंदरे विकसित करण्याची कामे हाती घेतली आहेत. गुजरातने खासगी बंदरे विकसित करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. यातील काही बंदरे, मोठय़ा सरकारी बंदरांपेक्षाही भव्य आहेत. महाराष्ट्रामध्येही रेड्डी (रायगड), रेवस, दिघी, जयगड, लवगाव आणि धमणकोळ इथे नवीन बंदरे विकसित होत आहेत. बऱ्याचशा किनारी राज्यांमध्येही खासगी बंदरे विकसित होत आहेत. आखाती देश, मध्यपूर्व व दक्षिणपूर्व आशियामध्ये बंदर व्यवस्थापनाशी संबंधित कामे (नियोजन, एजन्सीची कामे, स्टिवेडोअरिंग इ.) बाहेरून आलेले तज्ज्ञ व अधिकारी करतात. भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवामुळे इथे प्राधान्य दिले जाते. ही सर्व कामे व्यवस्थापनाशी संबंधित असल्यामुळे स्त्री-पुरुषांना समान संधी उपलब्ध आहेत.

बी.बी.ए. (शिपिंग व लॉजिस्टिक्स)

शिपिंग व लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये करिअरच्या अशा अमाप संधी उपलब्ध असूनही, या क्षेत्रामधील विशेष शिक्षण मात्र सहज उपलब्ध नाही. उद्योगधंद्यांना त्यासाठी बी.कॉम. व एम.बी.ए. पदवीधर यांच्यावर अवलंबून राहावे लागते. वास्को-द-गामा, गोवा येथील एम.ई.एस. कॉलेजने पुढाकार घेऊन बी.बी.ए. (शिपिंग व लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट) हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. मान्यताप्राप्त संस्थेच्या कुठल्याही शाखेतून (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनल) बारावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करायला पात्र ठरू शकतात. हा पदवी अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाशी संलग्न असून 'यूजीसी'च्या (विद्यापीठ अनुदान आयोग) 'इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री रिलेटेड प्रोग्राम्स' या योजनेखाली निवडला गेला आहे. शिपिंग क्षेत्रातील बहुतेक अभ्यासक्रम तांत्रिक स्वरूपाचे असतात. हा आगळावेगळा अभ्यासक्रम मात्र शिपिंग व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

या अभ्यासक्रमामध्ये शिपिंग व्यवस्थापन व लॉजिस्टिक्सशी संबंधित अनेक विषय शिकवले जातात. उदा. बंदर व एजन्सी व्यवस्थापन, मेरिटाइम लॉ, मेरिटाइम इन्शुरन्स, चार्टरिंग, संगणक व्यवस्थापन इ. याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील वित्त व मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, उत्पादन व्यवस्थापन असे अनेक विषयही शिकवले जातात. शिकवण्याची अनोखी पद्धत विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी प्रशिक्षित करते. अधिक माहिती www.beamsgoa.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

करिअरच्या संधी

ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. हे पदवीधर बंदरे, शिप ब्रोकर्स, फ्रेट फॉर्वर्डिग कंपन्या, शिपिंग लॉ कन्सल्टंट, एअर कार्गो, आयात-निर्यात कंपन्या, मरीन इन्शुरन्स कंपन्या, लॉजिस्टिक्स व रीटेल क्षेत्र इ. ठिकाणी काम करू शकतात. या क्षेत्राची व्याप्ती व यातील अनेक संधी यांचा विचार केला तर अशासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्याची आज गरज आहे, असे म्हणावे लागेल. आपल्या देशामध्ये मेरिटाइम लॉ, मेरिटाइम इन्शुरन्स, ब्रोकरेज, चार्टरिंग व संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाच्या संधीही उपलब्ध नाहीत. आपण अजूनही त्यासाठी इंग्लंडवर किंवा तिथे शिकून आलेल्या मोजक्याच तज्ज्ञांवर अवलंबून आहोत. तेल प्रदूषण, अपघात इ. अनेक बाबींसाठी भारतीय विमा कंपन्याच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला परदेशी सेवांवर अवलंबून राहावे लागते. चेन्नई येथील इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने या संदर्भात काही ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.नजिकच्या भविष्यात यासंदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच संशोधनातील संधी विद्यार्थ्यांना  उपलब्ध झाल्या तर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात भर पडेल, हे निश्चित.


For Details :  http://www.loksatta.com/career-vrutant-news/opportunities-in-shipping-551358/

शुक्रवार, १६ मे, २०१४

आयुष्याची वाट



आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच ।
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाटही जगते।।४।।

'वाट' लागण्यात सुध्धा
'वाटे'चीच बाजी।
चुकली 'वाट' तरी
'वाटे'चीच बाजी।।५।।

↝↝S. More↜↜

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

प्रयत्न

प्रयत्नांना पर्याय नाही
आडवाट नाही; पळवाट नाही
प्रयत्न ही एक प्रक्रिया आहे..
प्रतिष्ठा असो वा धन,
यश असो वा सन्मान,
कौशल्य असो वा ज्ञान,
प्रयत्नांशिवाय प्राप्ती नाही.
प्रयत्नांशिवाय पात्रता नाही.
मुंगी जे खाद्य घेऊन वावरते
ते तिच्या अंदाजे आठपट असतं,
सुगरणीचा खोपा वा कोळ्याचं घर
आपल्यासाठी नवल असतं..
अंगभूत कौशल्य असतंच, मात्र
त्यात पारंगत बनण्यासाठी;
किंवा साध्य प्राप्त करण्यासाठी
प्रयत्नांमध्ये सातत्य हवं..
नियोजन, शिस्त नि लक्ष्य हवं.
स्वत:च्या क्षमता नि वेगळेपण
प्रयत्नांशिवाय कळत नाही,
कृतीतून अनुभवल्याशिवाय
शहाणपण काही मिळत नाही.
प्रयत्न करणाऱ्यांसाठी कठीण
वा अशक्य असं काही नसतं,
धडपडणाऱ्या मनामनांत
'कोलंबसचं गीत' प्रेरणा असतं.
ग्रहांच्या अपेक्षित फलापेक्षा
प्रयत्नांचा 'निग्रह' अधिक हवा.
आकाशाला कवेत घेण्यासाठी
प्रयत्नांवरच भरवसा असावा.
'काय करू नये' ठरवलं की,
स्वत:ला आपसूक गवसत जातो.
चुकत माकत चकचकीत होत
माणूस म्हणून घडत राहतो................................