शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

देहदंड हीच शिक्षा.. कसाबची

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी क्रूरकर्मा मोहंमद अजमल अमीर कसाबच्या फाशीवर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. मात्र फहीम अर्शद मोहंमद अन्सारी व सबाउद्दीन अहमद शब्बीर अहमद शेख या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 
भारतीय दंडविधान आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये एकूण सहा गुन्ह्यांसाठी कसाबला आधी मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलेल्या व नंतर उच्च न्यायालयानेही कायम केलेल्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आफताब आलाम व न्या. चंद्रमौली के. प्रसाद यांच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख यांना निर्दोष ठरविण्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने केलेले अपीलही न्यायालयाने फेटाळून लावले. 
मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे सीमेपलीकडून भारताविरुद्ध पुकारले गेलेले युद्ध होते. त्यात सहभागी होऊन १६६ निरपराध नागरिकांची हत्या करणारा कसाब कोणतीही दया दाखविण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने जाहीर केले.
आपल्याविरुद्धचा खटला स्वतंत्र व नि:पक्षपणे झाला नाही. आपल्याला सुरुवातीस वकील दिला गेला नाही. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या व्यापक कटात मी सहभागी नव्हतो. अल्लाच्या नावे 'ब्रेनवॉशिंग' केल्याने या गुन्ह्यात मी फक्त यंत्रवत सामील झालो, असे कसाबने घेतलेले बचावाचे नानाविध मुद्दे न्यायालयाने ठामपणे फेटाळून लावले. कोणताही दहशतवादविरोधी कायदा हाताशी नसताना देशाच्या इतिहासातील या सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन तड लावणे श्क्य झाले, हे विशेष उल्लेखनीय आहे. 


.आणि सैतान फक्त हसला!
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल ऑर्थर रोड तुरुंगात सांगण्यात आला, तेव्हा कोणतीही उघड प्रतिक्रिया न देता कसाब आपल्या खास बेफिकीर शैलीने फक्त हसला, असे सूत्रांनी सांगितले. कसाबने उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील अपिले तुरुंगातूनच केली होती. 
आजच्या निकालानंतर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा त्याचा विचार आहे की नाही, हे लगेच समजू शकले नाही. मात्र तो असे अर्ज करू शकतो, याची त्याला जाणीव करू देणे तुरुंग व्यवस्थापनाकडून अपेक्षित आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा