शनिवार, ३० जून, २०१२

नायझेरियनला पोलीस कोठडी

नवी मुंबई। दि. २९ 
बनावट अमेरिकन डॉलरसह पकडलेल्या कोनका हेन्ड्री (२२) या नायझेरियनची पनवेल न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. 
त्याच्याजवळील बॅगेतून पोलिसांनी बनावट अमेरिकन डॉलर हस्तगत केले आहेत. खारघर येथील मुंबई-पुणे महामार्गावरील हिरानंदानी स्टॉपजवळ हा त्याच्या साथीदारासह बसची वाट पाहत उभा होता. या स्टॉपसमोरच खारघर वाहतूक शाखेची चौकी आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार डी.टी. बळवंत आणि पोलीस नाईक ए.बी. पवार यांना या दोघा नायझेरियनचा संशय आला. ही बाब त्यांनी ठाणे अंमलदार डी.बी. काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही कर्मचार्‍यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हेन्ड्री त्यांच्या हातात सापडला. दुसर्‍या नायझेरियनने हातातील बॅग टाकून तेथून पळ काढला. 
हेन्ड्री याला बॅगेसह खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या बॅगेत अमेरिकन डॉलरच्या ५५ बंडलमध्ये २८१ बनावट डॉलर आहेत. या बंडलमध्ये वर आणि खाली डॉलर लावण्यात आले असून, मध्ये कोरे कागद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांनी दिली. सर्व डॉलरवर एकच सिरियल आहे. आरोपीकडून एक मोबाईल व तोंडाला लावण्याचे मास्क जप्त करण्यात आले आहेत. >त्न/> कोनका हेन्ड्री (२२) या नायझेरियनला न्यायालयात हजर करण्यात आले.

शनिवार, २३ जून, २०१२

सरकार जाणार भाड्याच्या घरात

महाभयंकर आगीनंतर सावरलेल्या सरकारने आज गतीने कामकाज सुरू केले आणि भाड्याच्या जागा शोधण्याची मोहीमही उघडली. कोणत्याही परिस्थितीत सगळी यंत्रणा पूर्ववत करण्याला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सध्या सरकारला सगळे कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी तब्बल १ लाख ५५ हजार स्क्वेअर फूट जागा हवी आहे. एवढी एकत्रित जागा कोठे मिळेल याचा शोध सध्या सुरू झाला आहे. प्रधान सचिव सुमीत मलिक व पी.एस. मीना या दोघांनी ठिकठिकाणच्या जागा शोधण्याचे काम सुरू केले. त्यांनी नऊ ठिकाणच्या जागा पाहिल्या. त्यातल्या एमटीएनएलच्या ३0 हजार स्क्वेअर फूट जागेसाठीचा भाडेकरारही आज तातडीने करण्यात आला.