गुरुवार, २६ जुलै, २०१२

मराठी राजकारणाची अवकळा

राष्ट्रीय काँग्रेस आणि पवारांची काँग्रेस यांच्यात काल झालेला तह त्यांच्यातील संबंधितांच्या महत्त्वाकांक्षा काही काळ म्यान करणारा असला तरी त्यांच्यातील युद्ध संपविणारा नाही. शरद पवारांचे लक्ष्य लांबचे आणि उंचीचे आहे. ते गाठायचे तर त्यांना त्यांच्या बैठकीची सध्याची जागा अपुरी पडणारी आहे. तिचे क्षेत्रफळ वाढवून घेतल्याखेरीज त्यांना आणखी उंच उडी घेता येत नाही. कुरबुरी, कुरापती आणि रुसवेफुगवे प्रगटायचे आणि जमेल तेवढी जागा कोरून घ्यायची असे त्यांचे सध्याचे राजकारण आहे. ते जेवढे करमणूक करणारे तेवढेच त्यांच्याविषयीची अनुकंपा वाटायला लावणारेआहे. पवारांचा पक्ष स्वत:चे बळ वाढविण्याचा प्रयत्न करणार आणि तसे करताना त्याला काँग्रेसला दुबळे करावे लागणार हे राजकारण कोणालाही कळणारे आहे. पण दिल्लीत काँग्रेस बलशाली आहे आणि तिच्या बाजूने नवनवे व अधिकाधिक सार्मथ्यवान मित्र येऊन उभे राहताना एवढय़ात दिसले आहेत. उलट महाराष्ट्रात तो पक्ष पहिल्या क्रमांकावर असला तरी त्याचे स्थानिक नेतृत्व वेळकाढू राजकारण करणारे आहे. ते निर्णय लांबणीवर टाकते आणि कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका घेताना कधी दिसत नाही. त्याचवेळी पवारांच्या मराठी अनुयायांचा वर्ग संघटित, आक्रमक आणि कोणत्याही आरोपाची फारशी पर्वा न करण्याएवढा उदंड आहे. त्या वर्गाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पक्षीय सहकार्‍यांची सर्व बाजूंनी कोंडीही चालविली आहे. सिंचन खात्यातील गैरव्यवहारावर ते सरकारला श्‍वेतपत्रिका काढू देत नाहीत. तटकर्‍यांवरील आरोपांची चौकशी करू देत नाहीत. लवासामधील घोळ निस्तरू देत नाहीत आणि राज्य सहकारी बँकेचे बुडीत प्रकरण धसाला लावू देत नाहीत. मुख्यमंत्र्यांना बहुमतासाठी ज्यांची गरज आहे ते असे अडवणूक करणारे आणि जे पाठिंबा देणारे व जवळचे आहेत ते त्यांच्या विश्‍वासात न बसणारे. त्यातून विरोधक बलवान. ते यांची गंमत दुरून पाहणारे आणि जमेल तेवढे तीत तेल टाकणारे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात समन्वय समित्या बनविल्या काय आणि त्यांच्या दरमहा बैठकी भरविल्या काय, त्यातून काही साध्य व्हायचे नाही. खर्‍या समझोत्याला विश्‍वासाचे वातावरण लागते. तो करणार्‍यांना परस्परांच्या हेतूविषयी आदर वाटावा लागतो. येथे दोन्ही बाजूंत नुसती स्पर्धाच नाही तर उभा सामना आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष यांना दिल्लीत जमले नाही तरी मुंबईत जमिनीवर लोळवू असा पवार पक्षाचा होरा तर त्यांना दिल्लीएवढेच महाराष्ट्रातही उघडे पाडू ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची तयारी. यातून त्यांचे पवित्रे व धोरणे ठरणार. आमच्यावर अन्याय होत असल्याची खरीखोटी ओरड करणार आणि राज्यात सगळेच कसे वाईट चालले आहे याची जाहिरात सरकारात बसूनच केली जाणार. समझोता, मैत्री, एकोपा हे सगळे स्वच्छव पारदश्री मनाचे विषय आहेत. 'मुख्यमंत्री काही करीत नाहीत' हे पवारांनी जाहीरपणे म्हणायचे आणि 'सिंचनाची श्‍वेतपत्रिका काढूच' हे चव्हाणांनी सांगायचे. या तेढीतून विश्‍वास कसा उभा राहील आणि पारदर्शिता तरी कशी येऊ शकेल? सारांश, हा सत्तेत टिकण्याचा, मंत्रिपदे उबविण्याचा व त्यासाठी वेळकाढूपणा करण्याचा आजवर चाललेला खेळ आहे आणि तो यांना तसाच आणखी काही काळ चालवायचा आहे. त्यात जमतील तेवढे एकमेकांचे कपडे फाडायचे आणि जमेल तेवढे परस्परांना उघडे करीत रहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आधी आघाडीधर्माने ग्रासले आणि आता त्या आघाडीतील महत्त्वाकांक्षांनी भेडसावले आहे. मराठी राजकारणाची ही अवकळा ज्या दिवशी संपेल तो खरा सुदिन समजायचा.


By Source : Lokmat.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा