मंगळवार, १७ जुलै, २०१२

मृणालताई कालवश



जनसामान्यांसाठी केलेल्या आंदोलनातून पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई अशी ओखळ लाभलेल्या आणि सारे आयुष्य समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आज वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. 
वसई येथे मुलगी अंजली वर्तक यांच्याकडे गेल्या असताना त्यांना घशाचा त्रास होऊ लागल्याने कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृणालताईंच्या निधनामुळे रणरागिणी हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. 
मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे कुटुंबीय होते. बुधवारी त्यांचे पार्थिव वसईतून आणल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२पर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार गोरेगावातच होणार आहेत. निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. 
वैद्यकीय शिक्षणाला रामराम करून १९४७ साली त्यांनी समाजकारण आणि राजकारणाला वाहून घेतले. राष्ट्रीय सेवादलातून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एक वर्षातच काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली. महात्मा गांधी आणि लोहीया यांचा मृणालताईंवर मोठा प्रभाव होता. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या सहभागी झाल्या होत्या. १९७७ साली त्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. १९८0च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मृणाल व त्यांचे पती केशव गोरे यांनी गोरेगावमधील नागरी सोयीसुविधा सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रसाधनगृहे, सभागृहे, आरोग्य व कुटुंब नियोजन केंद्रे गोरेगावमध्ये त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. बिल्डरांपासून झोपडपट्टीयांना वाचवण्यातदेखील त्यांनी पुढाकार घेतला होता. 
कारकीर्द 
1961
साली नगरसेवक 
1972
साली राज्यात सर्वाधिक मते मिळवून विधानसभेत 
1977
साली जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत
1985 
साली पुन्हा लोकसभेत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा