शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

प्रयत्न

प्रयत्नांना पर्याय नाही
आडवाट नाही; पळवाट नाही
प्रयत्न ही एक प्रक्रिया आहे..
प्रतिष्ठा असो वा धन,
यश असो वा सन्मान,
कौशल्य असो वा ज्ञान,
प्रयत्नांशिवाय प्राप्ती नाही.
प्रयत्नांशिवाय पात्रता नाही.
मुंगी जे खाद्य घेऊन वावरते
ते तिच्या अंदाजे आठपट असतं,
सुगरणीचा खोपा वा कोळ्याचं घर
आपल्यासाठी नवल असतं..
अंगभूत कौशल्य असतंच, मात्र
त्यात पारंगत बनण्यासाठी;
किंवा साध्य प्राप्त करण्यासाठी
प्रयत्नांमध्ये सातत्य हवं..
नियोजन, शिस्त नि लक्ष्य हवं.
स्वत:च्या क्षमता नि वेगळेपण
प्रयत्नांशिवाय कळत नाही,
कृतीतून अनुभवल्याशिवाय
शहाणपण काही मिळत नाही.
प्रयत्न करणाऱ्यांसाठी कठीण
वा अशक्य असं काही नसतं,
धडपडणाऱ्या मनामनांत
'कोलंबसचं गीत' प्रेरणा असतं.
ग्रहांच्या अपेक्षित फलापेक्षा
प्रयत्नांचा 'निग्रह' अधिक हवा.
आकाशाला कवेत घेण्यासाठी
प्रयत्नांवरच भरवसा असावा.
'काय करू नये' ठरवलं की,
स्वत:ला आपसूक गवसत जातो.
चुकत माकत चकचकीत होत
माणूस म्हणून घडत राहतो................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा