सन २०२० पर्यंत भारतात टीव्ही चॅनेल्सच्या संख्येत भर पडणार असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. टीव्ही पत्रकारिता हा एक चांगला करिअर पर्याय म्हणून नव्या पिढीने निश्चितच आजमावून पाहायला हवा.
नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर सायंकाळी ७ वाजता आपल्या घरात घुमणारा आवाज असो किंवा मग हल्लीची ब्रेकिंग न्यूज असो. प्रभात समयी ऐकू येणारा ' यह आकाशवाणी है... ' असा आवाज असो किंवा एफएम वाहिन्यांवरील रेडिओ जॉकीचे श्रोत्यांना भुरळ घालणारे मनोरंजन असो. नानाविध मार्गांनी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची क्रांती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. एकविसावं शतक हे माहिती-तंत्रज्ञानासोबतच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचंही आहे. आज देश-विदेशातील अपडेट घडामोडी काही सेकंदांत आपण रिमोटची बटने प्रेस करून बघू शकतो. या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे प्रस्थ जगभरात पसरले आहे आणि त्यामुळेच या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज भारतात साधारण २०० राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तवाहिन्या , तर इतर क्षेत्रांशी संबंधित ६०० वाहिन्या आहेत. यात वृत्त , मनोरंजन , बिझनेससाठी वाहिलेले विशेष चॅनेल्स आहेत. टेलिव्हिजनच्या क्षेत्रामधील वाहिन्यांसोबतच रेडिओच्या एफएम वाहिन्यांनाही ' यंग टॅलेंट ' ची गरज असते. इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी युवकांनाही प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही बाबींचा व्यवस्थित मेळ घातल्यास या क्षेत्रातील एक चांगले करिअर नव्या पिढीसमोर खुले होऊ शकते.
आवश्यक कौशल्ये
या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी इंग्लिश , हिंदी , मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अशा संधींचं सोनं करण्यासाठी तांत्रिक कौशल्य , वाक्चातुर्य , सामान्य ज्ञान , राष्ट्रीय-आतंराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण करण्याची कला , प्रश्न विचारण्याचं कौशल्य , प्रभावी स्क्रिप्टिंग , न्यूज सेन्स , व्हिज्युअल नॉलेज यांची चांगली माहिती असणं गरजेचे आहे. ज्यांना पॉलिटिकल , फिल्म , क्राईम , बिझनेस इत्यादी विशिष्ट विषयांना वाहिलेल्या वाहिन्यांमध्ये काम करायची इच्छा आहे , त्यांना त्या-त्या क्षेत्राची किमान माहिती असणं आवश्यकच आहे.
आव्हानं
टीव्ही पत्रकारिता हे एक उत्तम करिअर असले , तरी या क्षेत्रातील आव्हानेही तितकीच प्रबळ आहेत. या क्षेत्रात येणाऱ्यांकडे रिस्क घेण्याची तयारी असल्याशिवाय प्रगती होऊच शकत नाही. त्यामुळेच काही नवीन करून दाखवायची आणि आव्हानं स्वीकारायची तयारी असेल त्यांनीच या क्षेत्राचा विचार करणं सोयीचं ठरतं. त्यासाठीचं शिक्षण- प्रशिक्षण पुरविणाऱ्या विविध संस्थांमधून टीव्ही पत्रकारितेमधील पदवी , पदव्युत्तर डिप्लोमा आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. अशा संस्थेत प्रवेश घेताना न्यूजरूम , एडिट सूट , इन-हाउस प्रॉडक्शन , इन-हाउस पब्लिकेशन , व्याख्याते , प्रत्यक्ष टीव्हीमध्ये काम करणारे आणि त्या संस्थेमध्ये शिकविण्यासाठी उपलब्ध होणारे गेस्ट लेक्चरर , लायब्ररी , कॅसेट लायब्ररी , वेब लॅब इत्यादी बाबींविषयी माहिती करून घेणं आणि आपण प्रवेश घेत असलेल्या ठिकाणी या सर्व बाबींची उपलब्धता तपासून पाहाणे आवश्यक ठरतं. त्यासोबतच या अभ्यासक्रमांची मान्यता , त्याला परवानगी देणाऱ्या युनिव्हर्सिटीज आदी बाबींचीही चौकशी करावी.
संधी
टीव्ही पत्रकारितेची पदवी असल्यास तुम्ही फ्री-लान्स म्हणजेच कोणत्याही विशिष्ट वाहिनीसाठी काम न करता सर्वांसाठी काम करणारी व्यक्ती म्हणूनही काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिज्युअल एडिटिंगची चांगली माहिती असणं आवश्यक आहे. आज वृत्तवाहिन्या अनेक आउटडोअर प्रॉडक्शन हाऊसेसकडून फीचर बेस्ड , करंट अफेअर , टॉक शो , इंटरअॅक्टिव्ह बेस्ड प्रोग्रॅम्स तयार करून घेतात. सन २०२०पर्यंत भारतात टीव्ही चॅनेल्सच्या संख्येत भर पडणार असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता , टीव्ही पत्रकारिता हा एक चांगला करिअर पर्याय म्हणून नव्या पिढीने निश्चितच आजमावून पाहायला हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा