शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

काळ्या मातीत मातीत




काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं


गीत-विठ्ठल वाघ
संगीत-अनिल-अरुण
स्वर-अनुराधा पौडवाल,  सुरेश वाडकर
चित्रपट-अरे संसार संसार (१९८१)

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

अरे कृष्णा अरे कान्हा

 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना


आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

संतवाणी

 
 
अवघाचि संसार सुखाचा
 
 
अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥