गुरुवार, २६ जुलै, २०१२

मराठी राजकारणाची अवकळा

राष्ट्रीय काँग्रेस आणि पवारांची काँग्रेस यांच्यात काल झालेला तह त्यांच्यातील संबंधितांच्या महत्त्वाकांक्षा काही काळ म्यान करणारा असला तरी त्यांच्यातील युद्ध संपविणारा नाही. शरद पवारांचे लक्ष्य लांबचे आणि उंचीचे आहे. ते गाठायचे तर त्यांना त्यांच्या बैठकीची सध्याची जागा अपुरी पडणारी आहे. तिचे क्षेत्रफळ वाढवून घेतल्याखेरीज त्यांना आणखी उंच उडी घेता येत नाही. कुरबुरी, कुरापती आणि रुसवेफुगवे प्रगटायचे आणि जमेल तेवढी जागा कोरून घ्यायची असे त्यांचे सध्याचे राजकारण आहे. ते जेवढे करमणूक करणारे तेवढेच त्यांच्याविषयीची अनुकंपा वाटायला लावणारेआहे. पवारांचा पक्ष स्वत:चे बळ वाढविण्याचा प्रयत्न करणार आणि तसे करताना त्याला काँग्रेसला दुबळे करावे लागणार हे राजकारण कोणालाही कळणारे आहे. पण दिल्लीत काँग्रेस बलशाली आहे आणि तिच्या बाजूने नवनवे व अधिकाधिक सार्मथ्यवान मित्र येऊन उभे राहताना एवढय़ात दिसले आहेत. उलट महाराष्ट्रात तो पक्ष पहिल्या क्रमांकावर असला तरी त्याचे स्थानिक नेतृत्व वेळकाढू राजकारण करणारे आहे. ते निर्णय लांबणीवर टाकते आणि कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका घेताना कधी दिसत नाही. त्याचवेळी पवारांच्या मराठी अनुयायांचा वर्ग संघटित, आक्रमक आणि कोणत्याही आरोपाची फारशी पर्वा न करण्याएवढा उदंड आहे. त्या वर्गाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पक्षीय सहकार्‍यांची सर्व बाजूंनी कोंडीही चालविली आहे. सिंचन खात्यातील गैरव्यवहारावर ते सरकारला श्‍वेतपत्रिका काढू देत नाहीत. तटकर्‍यांवरील आरोपांची चौकशी करू देत नाहीत. लवासामधील घोळ निस्तरू देत नाहीत आणि राज्य सहकारी बँकेचे बुडीत प्रकरण धसाला लावू देत नाहीत. मुख्यमंत्र्यांना बहुमतासाठी ज्यांची गरज आहे ते असे अडवणूक करणारे आणि जे पाठिंबा देणारे व जवळचे आहेत ते त्यांच्या विश्‍वासात न बसणारे. त्यातून विरोधक बलवान. ते यांची गंमत दुरून पाहणारे आणि जमेल तेवढे तीत तेल टाकणारे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात समन्वय समित्या बनविल्या काय आणि त्यांच्या दरमहा बैठकी भरविल्या काय, त्यातून काही साध्य व्हायचे नाही. खर्‍या समझोत्याला विश्‍वासाचे वातावरण लागते. तो करणार्‍यांना परस्परांच्या हेतूविषयी आदर वाटावा लागतो. येथे दोन्ही बाजूंत नुसती स्पर्धाच नाही तर उभा सामना आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष यांना दिल्लीत जमले नाही तरी मुंबईत जमिनीवर लोळवू असा पवार पक्षाचा होरा तर त्यांना दिल्लीएवढेच महाराष्ट्रातही उघडे पाडू ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची तयारी. यातून त्यांचे पवित्रे व धोरणे ठरणार. आमच्यावर अन्याय होत असल्याची खरीखोटी ओरड करणार आणि राज्यात सगळेच कसे वाईट चालले आहे याची जाहिरात सरकारात बसूनच केली जाणार. समझोता, मैत्री, एकोपा हे सगळे स्वच्छव पारदश्री मनाचे विषय आहेत. 'मुख्यमंत्री काही करीत नाहीत' हे पवारांनी जाहीरपणे म्हणायचे आणि 'सिंचनाची श्‍वेतपत्रिका काढूच' हे चव्हाणांनी सांगायचे. या तेढीतून विश्‍वास कसा उभा राहील आणि पारदर्शिता तरी कशी येऊ शकेल? सारांश, हा सत्तेत टिकण्याचा, मंत्रिपदे उबविण्याचा व त्यासाठी वेळकाढूपणा करण्याचा आजवर चाललेला खेळ आहे आणि तो यांना तसाच आणखी काही काळ चालवायचा आहे. त्यात जमतील तेवढे एकमेकांचे कपडे फाडायचे आणि जमेल तेवढे परस्परांना उघडे करीत रहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आधी आघाडीधर्माने ग्रासले आणि आता त्या आघाडीतील महत्त्वाकांक्षांनी भेडसावले आहे. मराठी राजकारणाची ही अवकळा ज्या दिवशी संपेल तो खरा सुदिन समजायचा.


By Source : Lokmat.com

गुरुवार, १९ जुलै, २०१२

काका पंचत्वात विलीन..



बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी सार्शूनयनांनी आपल्या लाडक्या काकाचा अखेरचा निरोप घेतला. अक्षयकुमारचा मुलगा आणि राजेश खन्ना यांचा नातू आरव याने त्यांना मुखाग्नी दिला.

मंगळवार, १७ जुलै, २०१२

मृणालताई कालवश



जनसामान्यांसाठी केलेल्या आंदोलनातून पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई अशी ओखळ लाभलेल्या आणि सारे आयुष्य समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आज वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. 
वसई येथे मुलगी अंजली वर्तक यांच्याकडे गेल्या असताना त्यांना घशाचा त्रास होऊ लागल्याने कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृणालताईंच्या निधनामुळे रणरागिणी हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. 
मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे कुटुंबीय होते. बुधवारी त्यांचे पार्थिव वसईतून आणल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२पर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार गोरेगावातच होणार आहेत. निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. 
वैद्यकीय शिक्षणाला रामराम करून १९४७ साली त्यांनी समाजकारण आणि राजकारणाला वाहून घेतले. राष्ट्रीय सेवादलातून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एक वर्षातच काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली. महात्मा गांधी आणि लोहीया यांचा मृणालताईंवर मोठा प्रभाव होता. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या सहभागी झाल्या होत्या. १९७७ साली त्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. १९८0च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मृणाल व त्यांचे पती केशव गोरे यांनी गोरेगावमधील नागरी सोयीसुविधा सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रसाधनगृहे, सभागृहे, आरोग्य व कुटुंब नियोजन केंद्रे गोरेगावमध्ये त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. बिल्डरांपासून झोपडपट्टीयांना वाचवण्यातदेखील त्यांनी पुढाकार घेतला होता. 
कारकीर्द 
1961
साली नगरसेवक 
1972
साली राज्यात सर्वाधिक मते मिळवून विधानसभेत 
1977
साली जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत
1985 
साली पुन्हा लोकसभेत 

मंगळवार, १० जुलै, २०१२

खरिपाच्या पेरणीला सुरुवात

खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वाया जातात की काय अशी भीती शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. 
निसर्गाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. तेव्हा समाधानकारक पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बर्‍यापैकी पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला होता. तर उष्णेतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांना सुखद गारवा अनुभव्यास मिळाला होता. तसेच चांगल्या प्रकारे पाऊस होईल या आशेने शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते. त्यामुळे पाऊस पडेल की काय या प्रतिक्षेत शेतकरी असतो मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे.

रविवार, १ जुलै, २०१२

उसाची लागवड धोक्यात

बारामती व इंदापूर तालुक्यातील छत्रपती, माळेगाव व सोमेश्‍वर कारखान्यापैकी सोमेश्‍वर च्या कार्यक्षेत्रातील उसाची पिके अजून बर्‍यापैकी हिरवी आहेत. वीर धरणापासून सुरू होणारे सोमेश्‍वर चे कार्यक्षेत्र व ८५00 एकरावर ठिबक सिंचन योजना ही प्रमुख दोन कारणे ठरू शकतात. मात्र येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे